ठाणे भारत सहकारी बँक लि. चे विद्यमान अध्यक्ष श्री. माधव यशवंत गोखले यांचे दु:खद निधन

M-Y-Gokhale-Shraddhanjali

ठाणे भारत सहकारी बँकेचे संस्थापक संचालक, उपाध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान अध्यक्ष मा. श्रीयुत माधव यशवंत गोखले (मा.य.गोखले) यांचे दिनांक 28-12-2020 रोजी सकाळी 11.20 मिनिटांनी वृद्धापकाळामुळे  दु:खद निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 89 वर्षे होते. 1998 सालापासून आज मिती पर्यंत गेली 22 वर्षे  ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

कर्नाटकातील मु. कुंदगोळ, ता. धारवड येथून सुमारे 1954-55 च्या सुमारास ते ठाण्यात वास्तव्यास आले.  काही वर्षे ऑडिटर जनरल या कार्यालयामध्ये अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ठाण्यामध्ये  बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. काही वर्षातच ते कुशल बांधकाम व्यवसायिक म्हणून नावारुपास आले.  त्यांनी ठाणे-डोंबिवली-पुणे या ठिकाणी इमारतीचे बांधकाम केले होते.

श्रीयुत गोखले साहेब वयाच्या 60व्या वर्षानंतर कायद्यातील पदवी आणि पदवीत्तर परीक्षा उत्तीर्ण झाले.  अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेले गोखले साहेब प्रसंगानुसार कठोर निर्णयही घेत असत. कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना कायदा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊनच ते निर्णय घेत असत.

माननीय मा.य. गोखले साहेब ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाचे गेली अनेक वर्षे संचालक सदस्य, तसेच ठाण्यामध्ये गेली 18 वर्षे सुरु असलेल्या श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे संस्थापक अध्यक्ष होते.  न्यासातर्फे गुढीपाडव्या निमित्त गेली 18 वर्षे स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. तसेच ठाण्यामध्ये सन 2010  साली मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे झालेल्या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख सल्लागार आणि मराठी ग्रंथ संग्रहालयाचे काही वर्षे मा. अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

मा. य. गोखले साहेबांच्या दु:खद निधनामुळे ठाणे भारत सहकारी बँक परिवारातील सदस्यांचे कृपाछत्र हरपले आहे.

कै. मा.य. गोखले साहेब यांच्या आत्म्याला सद्गती व शांती प्राप्त होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

(अुत्तम भा. जोशी)
अुपाध्यक्ष
ठाणे भारत सहकारी बँक लि.